“पैल तो गे काऊ कोकताहे”

सुमारे 2 वर्षांपूर्वी माझ्या घरासमोर असलेल्या गुलमोहोरावर उन्हाळ्यात काही  लगबग दिसायला सुरुवात झाली. तसे आमच्या सोसायटीत पक्षीगण भरपूर. सगळीकडे लहान-मोठी झाडे असल्याने चिमण्या, कावळे, साळुंक्या, कबुतरे, वेडे राघू, छोट्या मुनिया, कधी बुलबुल आदी पक्षी नेहेमी दिसतात. कधी तर एरवी नागरी वस्तीत फारसे न दिसणारे हळद्या, भारद्वाज, खंड्या, काही अगदी नाजूक निळे-हिरवे पक्षी असेही पक्षी येतात. 

तर, 2 वर्षांपूर्वी उन्हाळ्यात गुलमोहोराच्या वरच्या टोकावर एका बेचक्यात थोड्या मोठ्या काड्यांचं एक घरटं आकार घेतांना दिसू लागलं. घरट्याचे कर्ते होते 2 कावळे. म्हणजे एक नर, एक मादी अशी एक जोडी. अधेमध्ये गॅलरीत ठेवलेल्या माझ्या खराट्याच्या काड्याही गायब व्हायला सुरुवात झाली. कावळा गॅलरीत येऊन कठड्यावर बसून, “जरा चार काड्या नेऊ का ताई?” असं नम्रपणे विचारून माझा होकार गृहीत धरून काड्या नेऊ लागला. आम्हीही उत्सुकतेने घरटं कसं आकार घेतंय हे रोज बघत होतो. झपाट्याने घरटं पूर्ण झालं. सौ कावळे यांना ते पसंत पडलं आणि त्यांनी इंटिरिअर डिझाईन हवं तसं करून घेतलं! 
उन्हाळा संपत आला. एक दोन मोठे वळीव बरसले. गुलमोहोराचं झाड सोसाट्याच्या वाऱ्या पावसात पूर्णपणे हेलकावत होत्या. फांद्या खूप वाकत होत्या. इकडे आमची चिंता वाढली, एवढ्या पावसात घरटं टिकेल का? पण जो चोच देतो तो त्या चोचीने पक्कं घरटं कसं बांधायचं याचा जीन ही देतो! कवळ्यांचं घरटं अजिबात हललं ही नव्हतं, चिवटपणे फांद्यात पक्कं बसलं होतं! 
पुढे 15-20 दिवसात कावळीने  अंडी घातली असावीत. ती दिसत मुळीच नव्हती पण आळीपाळीने दोघेही त्यांची काळजी घेताना दिसत होते. कावळा बायकोला प्रेमाने वेगवेगळ्या गोष्टी आणून तिचे डोहाळेही पुरवताना दिसत होता. 

थोड्या दिवसांनी घरट्यात हालचाल दिसायला लागली! दुर्बीण लावून नीट पाहिल्यावर 3 पिलं दिसली! आमच्याच घरी बाळं आली असावीत इतका आनंद आम्हाला सगळ्यांना झाला. पिल्लांची बारीक आवाजातली कावकाव- खरंतर कावकाव नाही, वेगळाच आवाज होता तो- ऐकू यायला लागली. इवलीशी पिल्लं आपल्या चमकदार इवल्या चोची उघडून भूक-भूक करत आणि त्यांना चविष्ट अन पौष्टिक आहार पुरवताना आई-बाबांची दमछाक होई! बाबा कावळ्याची जबाबदारी आणखीच वाढली. साहजिकच तो माझ्याकडून पिल्लांसाठी हक्काने जास्त खाऊ नेऊ लागला! 


बघता बघता तिन्ही  पिल्लं मोठी झाली.  एक दिवस आई कावळी पिल्लांना उडायला शिकवते आहे असं आम्हाला दिसलं. आम्ही खूप कुतूहलाने तो सगळा सोहळा बघितला. आधी वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर उडायला तिने त्यांना शिकवलं. मग 2-3 दिवसांनी पुढची इयत्ता. आईने झाडावर थांबायचं आणि बाबाने समोरच्या बिल्डिंगच्या कठड्यावर थांबायचं. पिल्लांनी एकीकडून निघून दुसरीकडे न धडपडता पोचायचं. आधी पिल्लं कुरकुर करत होती, घाबरत होती. बाबा पिल्लांची बाजू घ्यायचा, पण आईने कडक असावंच लागतं ना! ती मुळीच ऐकायची नाही. जवळजवळ ढकलूनच तिने पिल्लांना झेप घेऊन झाडावरून कसं उडायचं हे शिकवलं. तशी पिल्लं मोठी गुणाची! 4-5 दिवसात उडायला शिकली.
हळूहळू अन्न कसं मिळवायचं हेही शिकत पिल्लं मोठी झाली. त्यांचं असं निरीक्षण करता करता वर्ष गेलं. त्यानंतर पिल्लं वयात आली. दोन मुलं, एक मुलगी. गेल्या तिघांनीही अनुरूप जोडीदार मिळवले. सगळेजण मूळ घरट्याच्या जवळपासच्या ठिकाणी राहतात. कावळा कावळीचा संसार छान फुलला आहे. 


अजूनही रोज बाबा कावळा सकाळी आमच्या नाश्त्याच्या वेळी येतो, चार घास मागतो. 1 स्वतः खातो आणि 1 बायकोला घेऊन जातो. मुलांना बोलावून इतर 2-3 घास त्यांना घ्यायला लावतो. त्याच्याशी बऱ्याच गप्पाही होतात. कधी सौ कावळे येतात. त्या फार बोलत नाहीत पण आभार आठवणीने मानतात. 
शेंडेफळ बहीण सगळ्यांची लाडाची आहे! कधी बाबा सोबत तर कधी दादा सोबत येते. कावकाव करून “मला  मोठा घास हवा..” असा हट्ट करते. मोठी झाली तरी बाबाकडून, दादांकडून हक्काने चोचीत खाऊ भरवून घेते! लहान बहिणीने लाड करून घ्यायचे असतात हा जागतिक नियम आहे!!


लॉकडाऊनच्या काळात आम्ही सगळे घरीच असल्याने सध्या कावळे मंडळी दुपारी 1 वाजता ही न चुकता येतात. मला त्यांना अन्न द्यायला उशीर झाला तर इतका कल्लोळ करतात की बस! त्यांना अन्न दिल्याशिवाय गेल्या 2 वर्षात आमचा  एकही दिवस गेला नाही.  

या संपूर्ण काळात कावळ्यांचं खूप छान निरीक्षण करता आलं. केवळ रंग आणि आवाज यामुळे हा हुशार आणि समजूतदार पक्षी उगीच बदनाम झालाय. कावळे फार हुशार असतात, अचूक वेळेचं त्यांना भान असतं. कधीही स्वार्थीपणा करून एकट्याने ओरबाडून खात नाहीत, उलट एकमेकांना देऊन पुरवून अन्न खातात. जवळून पाहिल्यावर त्यांचा तुकतुकीत चमकदार काळा रंग आणि काळेभोर डोळे यांचं कौतुक वाटतं. स्कॅव्हेंजर प्रकारचा पक्षी असल्याने मजबूत चोच आणि भक्ष्य धरून उडता येईल असे लवचिक पण घट्ट पकड असणारे पंजे बघता येतात.


सध्या जागोजागी पसरलेल्या कबुतरांसारखं (खरंतर ते पारवे आहेत, कबुतरं नाहीत) कावळे कुठेही घाण करत नाहीत आणि प्रचंड संख्येने प्रजाही जन्माला घालत नाहीत. उलट स्कॅव्हेंजर म्हणून एकूण पर्यावरण साखळीत त्यांचं स्थान फार महत्वाचं आहे.
अनेकदा मी त्यांना एकमेकांचे पंख व्यवस्थित स्वच्छ करून देतांना पाहिलं आहे, प्रेमाने एकमेकांना चोचीत अन्न भरवताना पाहिलं आहे! गेल्या 2 वर्षात त्यांनी कुणीही जोडीदार बदललेला मी पाहिला नाही. सवयीने मला ते सगळे कावळे वेगवेगळे ओळखूही येतात.
कधी मला अन्न द्यायला उशीर झाला तर जो कुणी आला असेल तो खूप कावकाव करतो. मग मी बाहेर येऊन त्याला/तिला सांगते, “थांब जरा, आणून देते 2 मिनिटांनी..”. मग तो शांतपणे वाट बघत थांबतो. खाऊ मिळाला मी आभार मानून घेऊन जातो आणि नेहेमीप्रमाणे सगळेजण वाटून घेऊन खातात.


एक शेवटची गम्मत सांगून थांबते–

15 दिवसांपूर्वी आमच्या सोसायटीत जंतुनाशकाची फवारणी झाली होती. त्यानंतर 2-3 दिवस काही उंदीर मेलेले दिसत होते. इतकी आयती मेजवानी असल्यावर साहजिकच कावळे कुटुंबाला माझ्या हातच्या निव्वळ शाकाहारी अन्नाची तेव्हा गरज नव्हती. मला वाटलं की आता ही मंडळी 2-3 दिवस मुळीच फिरकणार नाहीत. 
पण दुपारी 1 वाजता रोजच्याप्रमाणे गॅलरीत कावकाव ऐकू आली. मी नवलाने बाहेर आले. श्री व सौ कावळे दोघेही  जोडीने आमच्यासाठी एक एक उंदीर घेऊन आले होते! बरीच कावकाव करून मी ते घ्यावेत म्हणून आग्रह चालला होता!! चातुर्मासात कांदे-वांगेही न खाणाऱ्या माझ्या पूर्ण शाकाहारी कुटुंबात हे उंदीर कसे चालवून घ्यावेत हा माझा प्रश्न मी त्यांना बराच वेळ सांगत होते. तरीही “बघ एकदा ट्राय करून…नाहीच आवडला तर उद्या घेऊन जाऊ परत..” असं म्हणून दोघे उंदीर माझ्याकडे सुपूर्द करून उडून गेले!! 
खरंतर मी काही फार मोठं काम केलं नाही. पण 2 वर्ष जिने आपल्याला रोज खाऊ घातलं तिला आपणही काही द्यायला हवं ही जाणीव या इवल्या पक्ष्यांना झालेली दिसत होती. 

मला प्रश्न पडला, “उपकाराची फेड अपकाराने करण्याची दुर्बुद्धी मनुष्यप्राणी कुठून शिकला असावा? जास्त उत्क्रांत (evolve) नक्की कोण झालं आहे- माणूस की निसर्गदत्त नियमांनुसार, जिव्हाळ्याने राहणारे हे प्राणी-पक्षी? “

(Photos: Aparna Joshi, http://www.ugaoo.com/, https://jooinn.com/, https://www.indiamike.com/)

One thought on ““पैल तो गे काऊ कोकताहे”

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started